करमाळा (अशोक मुरूमकर) : आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे यांना पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी यांच्याकडून दिलासा मिळाला आहे. सलग सहा महिने ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला गैरहजर राहिल्याच्या तक्रारीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिलेला अपात्रतेचा निकाल रद्द ठरवला असल्याने रोडे यांचे सरपंच पद कायम राहिले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध सरपंच रोडे यांनी पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. त्यावर अतिरिक्त विभागीय आयुक्त द्विदेवी यांनी निकाल दिला आहे. ‘ग्रामपंचायत सदस्य परवानगीशिवाय सलग सहा महिने गैरहजर असल्याबाबत सिद्ध होणे आवश्यक आहे. मात्र हजेरी नोंदवही, सभेचे इतिवृत्त, याबाबत शंका निर्माण होत असून रोडे हे सलग सहा महिने गैरहजर असल्याचे सिद्ध होत नाही,’ असे अतिरिक्त आयुक्त द्विदेवी यांनी आदेशात म्हटले आहे.
आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रोडे हे सलग सहा महिनेपेक्षा जास्त दिवस ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांना अपात्र करण्याची मागणी रविकांत घोडके यांनी केली होती. त्या तक्रारीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आदेश देत रोडे यांना अपात्र ठरवले होते. सरपंच रोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कलावती काळे, पार्वती रोडे व वत्सला काळे हे मासिक बैठकांना गैरहजर राहत असल्याची तक्रार घोडके यांनी केली होती. याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी आव्हाळे यांनी ‘पंचायतीच्या परवानगीशिवाय सलग सहा महिने अनुपस्थित असलेल्या सदस्याचे पद रद्द होते. घोडके यांनी केलेल्या तक्रारीनुसार कलावती काळे, वत्सला काळे व पार्वती रोडे यांचा जुलै २०२२ पासून डिसेंबर २०२२ या कालावधीत गैरहजर कालावधी हा १८० दिवसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या पात्र ठरत आहेत. मात्र रोडे यांचा गैरहजर कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.
रोडे हे २१ जून २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गैरहजर आहेत. सूचक किंवा अनुमोदक म्हणूनही त्यांचा उल्लेख नाही. त्यांचा गैरहजर कालावधी २०५ दिवस झाला. मासिक सभांना २५ दिवस अनुपस्थितीचा रोडे यांनी अर्ज केला होता. मात्र रजा मंजुरीचा अधिकार ग्रामपंचायतीस असून तसा ठराव होणे आवश्यक होते. ग्रामसेवक दत्तात्रय निकम यांच्या जबाबानुसार रोडे हे एका सभेच्या (पृष्ठ क्र. ६९) नोंदीनुसार उशिरा आले होते. त्यांनी रजिस्टर घेऊन खाडाखोड करत सही केली होती. दरम्यान रोडे यांनी संबंधित सही चुकून झाली असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणात रोडे यांना अपात्र ठरवण्यात आले होते. या आदेशाच्याविरुद्ध सरपंच रोडे यांनी अपील केले होते. त्यावर पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी यांनी बुधवारी (ता. ४) निकाल दिला आहे. त्यात रोडे यांचे सरपंचपद कायम ठेवण्यात आले आहे.
यामध्ये ॲड. सुरज महामुनी व ॲड. अजित विघ्ने यांनी कायदेतज्ञ म्हणून काम पाहिले. आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ. हरिदास केवारे, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत, माजी सरपंच बीभीषण खरात, महादेव गायकवाड, रंगनाथ काळे, सुनील काळे, भाऊसाहेब रोडे, विष्णू काळे, तात्या काळे, आण्णा रोडे, योगेश रोडे, दत्ता रोडे, नवनाथ भालेराव, संतोष भालेराव, विलास काळे, अमोल घोडके, नवनाथ शेवाळे, राजेंद्र रोडे यांचे सहकार्य, कष्ट व नियोजन यामुळे आम्हाला हा न्याय मिळाला असल्याचे सरपंच रोडे यांनी केले.