करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. त्यातूनच करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळा दौरा झाला. त्यात आमदार शिंदे यांनी करमाळ्याच्या विकासासाठी ३ हजार कोटी निधी आणला असे म्हटले होते. त्यावरून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
करमाळा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला तेव्हापासून ३ हजार कोटी रुपयांचा निधी हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर सोशल मीडियातून चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘हाच का ३ हजार कोटींचा विकास?’ असे म्हणत ‘हा आमच्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा कारभार’ असे म्हणत सहा प्रश्न केले आहेत. सोशल मीडियावर हे प्रश्न केले जात आहेत.
माजी आमदार नारायण पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्यात करमाळा मतदारसंघात प्रमुख लढत होईल, असे बोलले जात आहे. येथे बागल गट व जगताप गट यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. प्रा. रामदास झोळ व शिवसेनेचे (शिंदे) महेश चिवटे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या प्रश्नावर कोणत्याही गटाचे नाव नाही. मात्र यातून विरोधी गटाकडून शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘सहा महिने तहसीलदार नव्हते’, ‘अनेक महिने बीडीओ नव्हते’, ‘पारेवाडी मंडळामध्ये विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता एक महिन्यापासून नाहीत’, ‘अनागोंदी आणि भोंगळ कारभार तालुक्याच्या प्रशासन विभागामध्ये सुरु आहे’, ‘पाणी पुरवठा विभागात उपअभियंता जागेवर नाहीत’ व ‘अधिकाऱ्यांवर वचक नाही’, असे प्रश्न करत ‘हा आमच्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा कारभार’ असे म्हणत प्रश्न केले आहेत.