करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सस्पेंन्स वाढला आहे. शरद पवार यांच्याकडे तालुक्यातून माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह तीन इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी तिघांनी मुलाखती दिल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनी तत्काळ राष्ट्रवादीचे सभासदत्व घेऊन मुलाखती दिली आहे. तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. तर माजी आमदार पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार पाटील हे २०१४ मध्ये शिवसेनेकडून (ठाकरे गट) निवडणूक रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते. २०१९ मध्ये बागल यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पाटील यांची उमेदवारी कट झाली होती. त्यानंतर शिवसेनेत बंडखोरी करत पाटील निवडणूक रिंगणात उतरले होते. तेव्हा त्यांचा पराभव झाला होता.
माजी आमदार पाटील यांचा पराभव झाला होता तरीही महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान मिळाले होते. पुढे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुती सरकारमध्येही त्यांचे जिल्हा नियोजन सदस्यत्व कायम राहिले. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर करमाळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तेव्हापासून पाटील यांची ‘तुतारी’ निश्चित मानली जात आहे. दरम्यान सोलापुरात त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे वारे यांनीही ग्रीन सिग्नल दिला होता. त्यानंतर बार्शीत एका कार्यक्रमात त्यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख झाला होता. तर त्यांच्या उमेदवारीबाबत करमाळ्यात एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी याबाबत शरद पवार हेच निर्णय घेतील, असे म्हटले होते. हर्षवर्धन पाटील यांचा नुकताच प्रवेश झाला तेव्हाही त्यांचा उल्लेख झाला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांची उमेदवारीसाठी मुलाखत झाली आहे.
प्रा. झोळ हे दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत. ते मराठा चेहरा म्हणून जरांगे यांचे उमेदवार मानले जातात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठींबा दिलेला आहे. ते जरांगे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यात त्यांनीही आता शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. संतोष वारे यांनी तालुकाध्यक्ष म्हणून करमाळ्यात सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यांनीही या जागेसाठी दावा केला असून मुलाखत दिली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, ‘१९९० पासून आम्ही करमाळ्याची जागा लढत आहोत. यावेळी देखील आम्ही जागेसाठी दावा केलेला आहे. याबाबत ठाकरे यांच्याशीही बोलणे झालेले आहे. आम्ही जागेचा दावा सोडलेला नाही. आमच्याकडेही तुल्यबळ उमेदवार आहे. योग्यवेळी जाहीर करणार आहोत. उमेदवारीसाठी महाविकास आघाडी म्हणून जो निर्णय येईल तो आम्ही पाळणार आहोत. आम्ही येथील जागा विजयी कशी होईल यावर लक्ष देत आहोत’, असेही ते म्हणाले आहेत.