करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या बुधवारी करमाळा शहरातील दुपारी १२ वाजता लाईट गेली. सुरुवातीला बुधवार असल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लाईट गेली असेल, पाच वाजेपर्यंत येईल असा अनेकांचा समज झाला. त्यानंतर पाच वाजले मात्र तरीही लाईट आली नाही, पुन्हा अनेकांना वाटले सहा वाजता येईल, मात्र तरीही वीज आली नाही. अनेकांचे मोबाईल डिस्चार्ज झाले होते. काहींनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन लावले काहींनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावले. परंतु अपवाद वगळता अधिकाऱ्यांचेही फोन बंद! तेव्हा मात्र अनेकांचा पारा वाढत गेला आणि अधिकाऱ्यांवर रोष वाढू लागला. वीज का गायब झाली आहे याचे उत्तरंही स्पष्टपणे समजू शकेना अखेर मध्यरात्री बाराच्या दरम्यान वीज आली. मात्र ही वीज का गेली होती? अधिकाऱ्यांनी खरंच कामात कसूर केला का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्वाचे वास्तव ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी बुधवारी वीज गेली नव्हती. हे आता निश्चित झाले आहे. मग वीज का गेली होती, असा प्रश्न राहतो. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या करमाळा उपविभाग येथील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी करमाळा शहरातील नियमितपणे वीज सुरु होती. श्रीदेवीचामाळ परिसरात करमाळा नगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम सुरु होते. संबंधित जेसीबी चालकाला आमच्या परवानगीशिवाय ‘येथे’ काम करू नको असे सांगितले होते. याबाबत तुमच्या मालकालाही सांगा असे स्पष्टपणे सांगितले होते. तो हो म्हटल्यानंतर संबंधित वीज वितरण कंपनीचे अधिकारी तेथून गेले. दरम्यान काही वेळातच वीज गेली. त्यानंतर तांत्रिकदृष्टया वीज सुरु करण्याचा प्रयत्न केला मात्र वीज ड्रीप झाली. त्यामुळे काहीतरी बिघाड झाला असा संशय आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठवले मात्र, तेथे खूप खड्डा किंवा बिघाड झाला असेल असा अंदाज आला नाही. त्यानंतर सर्व टीम कामाला लागली आणि बिघाड कोठे झाला याचा शोध सुरु झाला.
ज्या ठिकाणी बिघाड झाला होता. तेथे वीज वितरण कंपनीची अंडरग्राऊंड केबल आहे. एक बंद पडली तरी दुसरी केबल त्यात आहे. त्यांनी दुसरी केबलही चेक केली मात्र वीज सुरु होऊ शकली नाही. त्यामुळे हा बिघाड तेथे झाला असेल असा संशय आला नाही. आणि संबंधित चालकाने आपली चूक झाकण्यासाठी त्यावर माती टाकली होती. त्यामुळे जास्त संशय आला नाही. मात्र वीज का येईना म्हणून करमाळा शहर व ग्रामीणचे सर्व अधिकारी व कर्मचारी याशिवाय ठेकेदाराचे सर्व कर्मचारी सर्व लाईन फिरत होते. बिघाड त्वरित निघावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान त्यांचेही मोबाईल बंद पडले. त्यामुळे कोणाला संपर्कही साधता येईना.
अशा स्थितीत करमाळ्याला येणारी मांगीकडील संपुर्ण लाईन चेक करण्यात आली. मात्र बिघाड सापडला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून करमाळ्याला जेऊर येथूनही वीज आहे. मात्र त्या लाईनचे एका वाहनाने धडक देऊन खांब पाडले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो पर्याय वापरता आला नाही. मग दुसरा काय मार्ग आहे का? हे शोधत असताना करमाळा शहराला कुर्डवाडीकडूनही वीज येऊ शकते, अशी व्यवस्था आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून त्याचा वापर झालेला नसल्याने त्यात अनेक ठिकाणी झाडे आलेली होती. मात्र आता याच पर्यायाने वीज येऊ शकते हे निश्चित झाले आणि काम सुरु केले. हे करत असताना काहीही करून वीज सुरु करणे हे आव्हान होते. त्यासाठी दुसरे पर्याय शोधले जात होते. बिघाड शोधण्यासाठी बारामती आणि पुण्यातील पथकालाही बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना येण्यासाठी लागणारा वेळ लक्षत घेऊन करमाळा येथील सर्व टीम काम करत होती.
दरम्यान पोटेगाव येथूनही करमाळ्याला वीज घेता येऊ शकेल असा अंदाज आला. मात्र त्याची वीज जोडणी कशी करायची हे आव्हान होते. कुर्डुवाडी लाईनला जोडणे हा पर्याय होता. मात्र त्याची लाईन कट करावी लागत होती. त्यानुसार काही ठराविक अंतरावर ती लाईन कट केली आणि त्याच लाईनला क्रेनच्या साह्याने जीव धोक्यात घालून हवेत जम्प देण्यात आला आणि वीज सुरु झाली.
सकाळपासून सर्व अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून करमाळकराना वीज देण्यासाठी प्रयत्न करत होते. पाणी- जेवण अशी कोणतीही व्यवस्था नसताना केवळ काहीही करून वीज सुरु केली पाहिजे या भावनेतून त्यांचा हा प्रयत्न होता. ठेकेदाराच्या एका चुकीमुळे हा प्रकार झाला, असे सांगण्यात येत आहे. त्याने थोडे ऐकले असते तर हा एवढा मोठा बिघाड झाला नसता. हा बिघाड झाला ठीक पण यात जीवितहानी देखील होऊ शकली असती. ज्यावेळी जेसीबीने वायर कट झाली. तेव्हा नक्कीच जाळ झालेला असणार त्यात इतर धोकाही होऊ शकला असता. हा प्रकार झाल्यानंतर त्याने किमान सूचना देणे आवश्यक होते. अंडरग्राउंड केबलला बिघाड झाला तर तो शोधण्याची यंत्रणा पुणेकिंवा बारामती येथून आणावी लागते. पहिल्यांदा आम्ही वीज सुरु करण्याला प्राधान्य दिले, असे येथील अधिकारी सांगत आहेत. यातूनच सकाळी १२ वाजता गेलेली लाईट रात्री १२ वाजता आली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगूनही जेसीबी चालकाने ऐकले नाही. शिवाय चूक लपवण्याच्या नादात त्यावर माती टाकून निघून गेला, याचा परिणाम सर्वांवर झाला.
वीज सुरळीत करण्यासाठी जेसीबी, क्रेनचा वापर करण्यात आला. वीज वितरण कंपनीचे ४० व ठेकेदाराचे २० कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय पुणे येथील तीघांची टीम अंडरग्राऊंड केबल टेस्टींग मशीन घेऊन काम करत होते. कनिष्ठ अभियंता सुनिल पवार, करमाळा शहर शाखाधिकारी आर. बी. शिंदे, ग्रामीणचे शाखाधिकारी कार्तीक वाघमारे, सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे, ठेकेदार बापू घरबुडे, सारंग पुराणीक, नसरुद्दीन पठाण, मिटू वीर, हर्षद शेख, बाळू भांडवलकर, मनोहर साळुंखे, विरेंद्र लष्कर, जावेद शेख, प्रशांत गंधे, बंदपट्टे, अंगद वनवे, बी. एस. गायकवाड, सुनिल ओतारी, सोनू सातपुते, सुशान वीर याचे पथक काम करत होते.