करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला. डॉ. वंदना भाग्यवंत यांचे यावेळी व्याख्यान झाले. ‘वाचनाने व्यक्तिमत्व कसे प्रफुल्लित होते’ हे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या काळामध्ये वाचन करणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. त्यांनीही वाचनाची सुरुवात कशापासून करावी म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद शेटे यांनी तर आभार बी. ए. भाग १ मधील विद्यार्थी विश्वंभर लांडगे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
