करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्र येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे स्पष्ट संकेत माजी आमदार पाटील यांनी दिले आहेत. ‘वरच्या लेव्हलला शरद पवार व जयंत पाटील यांच्या माध्यमातून ते पाठींबा देतील असे आम्हाला निश्चित वाटत आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.
करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार पाटील यांनी आज (गुरुवारी) महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, ‘जगताप व आमच्यात कोणतेही बोलणे झालेले नाही. मात्र वरच्या लेव्हलवरून शरद पवार व जयंत पाटील यांच्या माध्यमातून जगताप हे आम्हाला पाठींबा देतील, असे निश्चित वाटत आहे.’
माजी आमदार जगताप यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीला आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा दिला होता. यावर्षी त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार शिंदे यांच्या बॅनरवर जगताप यांचा फोटो वापरला जात आहे. त्यात पाटील गटाचे प्रमुख माजी आमदार पाटील यांनी जगताप आम्हाला पाठींबा देतील, असे निश्चित वाटत असल्याचे सांगितले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.