करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अजूनही नाव गुलदस्त्यात असून येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर माजी आमदार पाटील यांना शरद पवार यांनी महाविकास आघाडीची ‘तुतारी’ देऊन आधीच डाव टाकला आहे. येथे महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी आमदार शिंदे विरुद्ध माजी आमदार पाटील यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र चुकीची उमेदवारी गेली तर महाविकास आघाडीला फायदा होऊन पाटील विजयी होऊ शकतात. त्यामुळे महायुती चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.
महायुतीमधील घटक पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे) व भाजप यांच्यात ही जागा कोणाला जाणार हे महत्वाचे आहे. गेल्या (२०१९) विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदे हे अपक्ष होते त्यांना अखंड राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता. आमदार शिंदे हे अजित पवार यांना नेते मानतात. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत कधीही प्रवेश केला नव्हता. आणि त्यांचे कार्यकर्तेही त्यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची आग्रही मागणी करत आहेत. शिंदे हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठींबा दिला नाही तरी निवडणूक सोपी असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचा पारंपरिक विरोधी मतदार आहे तो अपक्ष असल्याने शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मदत करील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महायुतीतील शिवसेनेची येथील जागा आहे. आमदार शिंदे घड्याळावर रिंगणात उतरणार नसतील तर ती जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची आहे. तर भाजपचे दिग्विजय बागल या जागेसाठी प्रयत्न करत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी निष्ठावंतांना जागा द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे येथील जागेचा सस्पेन्स वाढला आहे. महायुतीला ही जागा महत्वाची असून कोणत्याही स्थितीत ही जागा जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असून फायदा- तोट्याचा विचार करूनच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा करमाळ्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे फायदा झाला आहे. त्यात माजी आमदार जगताप हे पाटील यांना पाठींबा देतील, असे चित्र निर्माण झाले असून याबाबत चर्चाही सुरु झाल्या आहेत. याचा मोठा फायदा पाटील यांना होणार आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीही येथे उमेदवारी देताना खबरदारी घेत असून अजूनही नाव गुलदस्त्यात ठेवले असल्याची चर्चा आहे.
प्रा. झोळ व बागल यांचा परिणाम होणार
करमाळा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांची उमेदवारी प्रा. झोळ यांना मिळेल अशी चर्चा आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा परिणाम महायुती, महाविकास आघाडी की अपक्ष उमेदवारावर होणार यांच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.