करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणातील बहुचर्चीत समजली जाणारी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे निश्चित झाली असून आता फक्त निवडणूक तारीख जाहीर होणे बाकी राहिले आहे. ही तारीख देखील लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधीकारी प्रियांका आंबेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिले आहेत. प्रारूप मतदार यादी त्यावर आक्षेप व अंतिम मतदार यादी अशी प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त झाले आहेत. आता निवडणूक जाहीर होणार असून अर्ज दाखल करणे, अर्ज छाननी, अर्ज मागे घेणे, मतदान व निकाल अशी प्रक्रिया जाहीर होणार आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. मात्र या कारखान्याभोवती तालुक्याचे राजकारण फिरत राहिले आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर दिसतो. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार हे पहावे लागणार आहे. हा कारखाना बागल गटाच्या ताब्यात असताना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला देण्याचा निर्णय झाला होता. कारखाना ताब्यात घेण्यासाठी उपाध्यक्ष सुभाष गुळवे कारखाना स्थळावर आल्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी हस्तपक्षेप करत ताबा प्रक्रिया रोखली होती. आता आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. बागल भाजपमध्ये आहेत. या निवडणुकीत कारखाना ताब्यात घेण्यासाठी पाटील गट प्रयत्न करणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट व बागल गट यांच्याही भूमिका महत्वाच्या असून प्रा. रामदास झोळ हे या निवडणुकीत उतरणार आहेत, असे त्यांनीच स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे हा कारखाना बंद असला तरी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिनाथसाठी अनेकांच्या सोईनुसार भूमिका बदलल्या असल्याचे तालुकावासीयांनी पाहिले आहे. या निवडणुकीत कोण कशी भूमिका घेणार आहे पहावे लागणार आहे.
प्रशासक कालावधीत शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनीही यामध्ये काम पाहिले. त्यानंतर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, डॉ. वसंतराव पुंडे यांचीही प्रशासकीय संचालक म्हणून वर्णी लागली होती.