बार्शी (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील युवासेनाच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध वीज चोरीप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल अरुण कानगुडे व मिलनकुमार उत्तमराव झपे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. करमाळा एमआयडीसीत टायर रिमोल्डींगमध्ये एप्रिल २०२३ पर्यंत ही वीज चोरी झाली आहे. बार्शीतील पथकाने ही कारवाई केली आहे. कानगुडे हे युवासेनेचे करमाळा तालुका प्रमुख आहेत.
करमाळा एमआयडीसीत कानगुडे यांच्या टायर रिमोल्डींगमध्ये वीज चोरी होत असल्याचा संशय वीज वितरण कंपनीच्या पथकाला आला होता. त्यानंतर त्यांनी वीज मीटरची तपासणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वीज वितरण कंपनीचे ४ लाख ६२ हजार ७७७ रुपयांचे नुकसान केले आहे. संबंधितांस तडजोड रक्कम २ लाख १० हजार असे ६ लाख ७२ हजार २७७ अशी रक्कम भरण्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी रक्कम न भरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुरेश जोगी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान युवासेनेचे कानगुडे म्हणाले, ‘ही कारवाई चुकीची झालेली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी आमचे बोलणेही झालेले होते.’