करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली कुकडी उजनी योजनेच्या माध्यमातून कामोणेसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवणार आहे, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.
करमाळा तालुक्यात आमदार शिंदे यांचा प्रचार दौरा सुरु आहे. बुधवारी त्यांची कामोणे येथे कॉर्नर बैठक झाली. आमदार शिंदे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील गावांना पूर्ण क्षमतेने कुकडीचे पाणी मिळावे यासाठी कायम प्रयत्न केला आहे. ज्या गावांना पाणी मिळत नाही तेथील काही चारीचेही काम केले आहे. या भागात शेतीला कायमचे पाणी यावे यासाठी आपण प्रयत्न करत आहे. त्यासाठी कुकडी उजनी योजना प्रस्तावित केली असून त्याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध केला आहे. ही योजना झाल्यानंतर मांगी तलावात कायमचे पाणी येईल. तेथून कामोणे तलावातही पाणी येणार आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. ‘
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विकासात मी कधीही राजकारण केले नाही किंवा कोणाची अडवणूकही केलेली नाही. आरोग्य, रस्ता, वीज व शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या कमला आम्ही कायम प्राधान्य दिले आहे. यावेळीही माझ्याकडून विकासाची कामे केली जातील’, असे आमदार शिंदे म्हणाले. यावेळी गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.