करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटावर टीका करण्यासाठी काहीच विषय नसल्याने आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याचा विषय काढला जातो. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या संस्था अडचणीत आणल्या. हाकेच्या अंतरावर असलेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी दिली का? शेतकऱ्यांना बोनस दिला का? असे प्रश्न करत भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
करमाळा येथे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ भवानी नाका येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रचार कार्यालयाचे आज (शुक्रवार) उदघाटन झाले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे आदी यावेळी उपस्थित होते. रश्मी बागल यांनी यावेळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाठी विजयी करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने नागरिकांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती देत बागल म्हणाल्या, ‘आदिनाथ व मकाई या कारखान्याकडे असलेल्या कर्जापेक्षा कराखन्याची मालमत्ता जास्त आहे. काहींनी कारखाने अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. काहींनी कारखाना विकले पण आम्ही कारखाना विकला नाही’, असे म्हणत कोणाचेही नाव न घेता त्यांनी टोला लगावला. शेतकऱ्यांचे देणी देण्यासाठी आम्ही आमची मालमत्ता घाण ठेवली. आमच्यावर आरोप करण्यासारखं दुसरं काही नसेल त्यावेती सगळ्यात पहिला दगड हा कारखान्यांवर पडतो’, असे बागल म्हणाल्या.
पुढे बोलताना बागल म्हणाल्या, ‘मकाई आणि आदिनाथ हे बागलांना खच्ची करण्यासाठी बळी पाडण्यात आले. शासकीय यंत्रणा वापरून याची चौकशी करा’, असे म्हणत त्यांनी कोणाचेही नाव न घेता टोला लगावला. सभेत आमच्याबाबत कोण बोलला तर तो रात्री गायब होत नाही. लोकशाहीत कोणीही कधीही बोलू शकतात’, असेही त्या म्हणाल्या.