करमाळा (अशोक मुरूमकर) : सोशल मीडियावर फोटो टाकण्याची धमकी देऊन २२ वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. यामध्ये पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करून सांशयीताला पकडले आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिवे यांच्याकडे आहे.
संशयित आरोपीने गरोदर पीडितेला आईच्या मोबाईलवर फोन करून करमाळा शहरात एका ठिकाणी बोलावले. ‘तु आली नाही तर मी तुझे माझ्यासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील,’ अशी धमकी संबंधित संशयित आरोपीने दिली. त्यानंतर पीडिता त्याच्याकडे गेली. तेव्हा तो तिला म्हणाला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्या सोबत चल. नाही आली तर फोटो व्हायरल करीन’ असे म्हणून पुन्हा धमकी दिली. त्यानंतर तो तिला करमाळा स्टँडवरून मोहोळ येथे एका लॉजवर घेऊन गेला.
पीडित महिलेने त्याला तिकडे जाण्यास विरोध केला, मात्र ‘तू नाही आली तर फोटो व्हायरल करून पतीला ठार मारील’ अशी धमकी दिली. त्याला गरोदर असल्याचे सांगूनही त्याने धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला. तेथून त्याने पीडितेला पुण्यातील उरुळी कांचन येथे नेहले. तेथे मुक्कम करून त्याने पुन्हा तिला धमकी देत सासवडला एका लॉजवर नेले. दरम्यान करमाळा पोलिसात यामध्ये बेपत्ता नोंद झाली होती. त्यावरून तपास सुरु असताना त्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना त्याला पकडले आहे. बेपत्ता नोंद होताच पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला होता. पीडितेच्या तक्रारीवरून करमाळा पोलिसात संशयितावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक चंदनशिवे यांच्याकडे याचा तपास सुरु आहे.