करमाळा (सोलापूर) : पाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी, फिसरेतील कृषी योद्धा शेतकरी गट, कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) अथर्व मंगल कार्यालय येथे एकदिवसीय कृषी प्रदर्शन होणार आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संगमनेर येथील कळस कृषी प्रदर्शनचे सागर वाकचौरे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत, याचा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कृषीतज्ञ्, केळी जाचक पॅटर्नचे जनक कपिल जाचक व डाळिंब मार्गदर्शक, कृषी तज्ञ, उद्यम पंडित राहुल रसाळ तसेच पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ हे या प्रदर्शनात मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता हे प्रदर्शन सुरू होणार आहे. या प्रदर्शनामध्ये फळबाग रोपे : जी ९- केळी टिशू कल्चर, डाळिंब, आंबा, एक्झॉटिक भाज्या व फळांची रोपे, हायटेक नर्सरी, सेंद्रिय शेती व उत्पादने: दहा ड्रम संच, गांडूळ खत, बायोगॅस, माती परीक्षण, गावरान सेंद्रिय बियाणे- भाजीपाला, अद्ययावत तंत्रज्ञान व स्मार्ट शेती : हवामान संच, सोलरपंप, फवारणी ड्रोन, ठिबक संच- उपकरणे, बजाज ऑटो, शेततळे कागद, शेटनेट हरितगृह, पशुधन : पशुखाद्य, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय, शेती विषयक संस्था : कृषि विभाग, गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि उद्योग व लघु उद्योगासाठी कर्ज बँक हे स्टॉल असणार आहेत. महिलांसाठी लाडकी बहीण लकी ड्रॉ असून विजेत्या महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात येणार आहे. खिलार- महाराष्ट्राची शान बैलजोडी व देश विदेशातील डॉग हे यामध्ये प्रमुख आकर्षण राहणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.
फार्मर कपमधील महिला गटांचा होणार विशेष सन्मान
खडतर परिस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील महिला एकत्र येऊन प्रथमच आपल्या गावामध्ये महिलांचे गट स्थापन करून शेती करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घोटी, शेलगाव क, पोटेगाव, फिसरे, कुंभारगाव, वीट, सरपडोह, हिसरे, साडे व कोर्टी येथील महिला शेतकरी गटांचा समारोप कार्यक्रमात विशेष सन्मान होणार आहे. तसेच तुर या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे राहुल राऊत (कुंभारगाव) व मका या पिकांमध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे अक्षय शेंडे (घोटी) यांचाही विशेष सन्मान होणार आहे.