करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमा नदीवरील कुगाव ते शिरसोडी या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. उजनी जलाशयातून इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडणारा कुगाव ते शिरसोडी हा पुल आहे. वेळेत या पुलाचे काम व्हावे यासाठी सर्व यंत्रणा येथे कार्यरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यात या पुलाचे भूमिपूजन झाले होते. पुलाच्या या कामासाठी ३८२ कोटी २२ लाख निधी मंजूर आहे. आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार संजयमामा शिंदे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, धुळाभाऊ कोकरे, बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदी यावेळी उपस्थित होते.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर ४० वर्षांनीं हे काम होत आहे. या पुलामुळे इंदापूर व करमाळा हे तालुके जवळ येणार आहेत. त्याचा फायदा दळणवळणासाठी होणार असून राज्याचे दोन विभाग जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहेत. बॅकवॉटर भागातील केळी, ऊस या शेतीमालाची वाहतूक तसेच पर्यटन विकास यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे.

