शेतात भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम सुरु होतं. वारं आणि पाऊस सुरु झाला तेव्हा आईला म्हटलं घरी चलं, मी गाडीकडे गेलो आणि पप्पा व मम्मी आवरत होते. त्यानंतर मी व पप्पा गाडीत बसलो. मम्मीला गाडीत बसं म्हटलं तर ती बसली नाही, पावसामुळे आम्ही निघोलो तेव्हा मम्मी साधारण कासराभरावर चालत होती. पावसात काहीच समजत नव्हते तेव्हा अचानक आवाज आला अन् मागे पाहिले तर मम्मी खाली पडलेली… हुंदके देत १४ वर्षाच्या ज्ञानेश्वरने सांगितली आईच्या मृत्यूची घटना.
गुळसडी येथे अंगावर वीज कोसळुन आज साधारण ४५ वर्षाच्या कमल सुभाष अडसुळ यांचा मृत्यू झाला. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलींचा विवाह झालेला आहे. एकुलता एक मुलगा ज्ञानेश्वर हा कालच दहावी उत्तीर्ण झाला.
ज्ञानेश्वर, कमल व सुभाष हे तिघे मायलेकर शेतात काम करत होते. काम करताना पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते घरी निघाले होते. तेव्हा मुलगा आईला गाडीत बस असं म्हणत होता मात्र त्या गाडीत बसल्या नाहीत. त्या मागे चालत होत्या. घर ते शेत साधारण चार किलोमीटर आहे. पावासात येत असताना अचानक वीज कोसळल्याचा मोठा आवाज आला. तेव्हा मुलाने मागे पाहिले तर आई खाली कोसळलेली.
त्यानंतर त्यांनी खासगी चारचाकी कारने करमाळा येथील खासगी रुग्णालयात आणले पण तेथे त्यांना घेतले नाही. नंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्यांना मृत घोषीत केले. डॉ. राहुल कोळेकर, डॉ. अमोल डुकरे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक संतोष देवकर आदींनी भेटी देऊन शासकीय प्रक्रीया पूर्ण केली.