करमाळा (सोलापूर) : जेऊर येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची माहिती आमदार नारायण पाटील यांना दिली. सोलापूर पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता जाधवर उपस्थित होते. ‘आम्हाला हक्काचे पाणी उचलू द्या’, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

दहिगाव उपसा योजनेबाबत आमदार पाटील यांनी मत मांडले. कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपविभागीय अभियंता राजगुरू, पाटबंधारे उपविभागचे उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, भिमानगरचे उपविभाग अभियंता यांत्रिकी घोडेस्वार, पाटबंधारे उपविभागचे कालवा निरीक्षक दाभाडे, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 करमाळाचे कनिष्ठ अभियंता आवटे, निवृत्त कनिष्ठ अभियंता शिंदे व देवकाते आदी यावेळी उपस्थित होते.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दहिगाव व कुंभेज येथील दोन्ही पंपगृहातील विद्युत पंपाची स्थिती व आवर्तन काळात येणाऱ्या अडचणीवर यावेळी चर्चा झाली. करमाळा तालुक्यासाठी दहिगाव उपसा सिंचनचे 1.81 टीएमसी पाणी उजनीत राखीव आहे पण हे पाणी संपूर्ण उचलले जाऊ शकत नाही. यामुळे आता आवर्तन कालावधी वाढला जावा आणि हक्काचा पाणीसाठा संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार आवरतने मिळाली पाहिजेत, अशी आपली भूमिका असून येत्या कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत आपण हा विषय मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी पोहोच केले जावे, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. माजी सभापती अतुल पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रा. अर्जुन सरक आदी उपस्थित होते.