करमाळा (सोलापूर) : तालुका युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना विस्तारक उत्तमजी आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल, शिवसेना (ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून (ता. १४) हे आमरण उपोषण होणार आहे, अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिली आहे.
पंधरा दिवसांत उस बिलाची पहिली उचल व एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, २०२२ मधील ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीबाधित म्हणून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ मिळावे. पंचनामे केले कागदपत्रे दिली तरी देखील मदत यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांचा दुरुस्त यादीत समावेश करून लाभ मिळवून द्यावा, करमाळा कोर्टी मंडलात महसूल कृषी विभागाच्या नियमानुसार अतिवृष्टी ऐवढा पाऊस नसल्याने या मंडळातील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
मात्र अशा ठिकाणी सततच्या पावसात समावेश करून मदत देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे करमाळा, कोर्टी मंडलातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सततच्या पावसात समावेश करून मदत मिळवून द्यावी, भुमीअभिलेख अद्ययावत नसणे, बॅंक खात्यास आधार लिंक नसणे जिवंत शेतकरी मयत दाखणे यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित आहेत. बॅंकेत खाते असताना पोस्टाचे खाते उघडणे सक्तीचे करत आहेत. एक दीड वर्षांपासून अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांची हेळसांड थांबावा या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याबाबत आवाज उठवून न्याय मिळवून घेण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे, असे ते म्हणाले आहेत.