करमाळा (अशोक मुरूमकर) : जुन्याचा आधार घेत भविष्यात काय होईल याचा अंदाज घेऊन सर्वांनी आंनदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन व्यख्याते गणेश शिंदे यांनी केले आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांचा आज (गुरुवारी) वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे सपत्नीक भव्य सत्कार झाला. यावेळी शिंदे यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान झाले.

व्यख्याते शिंदे म्हणाले, ‘विलासराव घुमरे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. भविष्याचा अंदाज घेऊन त्यांनी करमाळ्यात शैक्षणिक कार्य केले आहे. महाविद्यालयात नोकरी करत असताना मिळणाऱ्या पगारातून ते बाहेरगावी असलेल्या मित्रांना मदत करत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, तो आर्थिक सक्षम झाला पाहिजे अशी त्यांची कायम धारणा राहिली आहे. त्यातूनच त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. राजकारणातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना किंगमेकर अशी ओळख मिळाली.’

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘जुन्याचा आधार घेऊन कायम भविष्याचा अदांज घेऊन आनंदी जीवन जगले पाहिजे. आई वडील यांच्या कष्टाची जाण ठेऊन शिक्षण घेत चांगली नोकरी किंवा व्यवसाय करत आयुष्यात पैसा कमवणे आवश्यक आहे. पैशाला काही किंमत नाही असे कोण म्हणत असेल तर ते चूक आहे. चांगले जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. मात्र तो प्रामाणिक कष्ट करून कमावणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले. ‘व्यवसायात मार्केटींग महत्वाचे आहे. त्यासाठी कौशल्य पाहिजे. हे पटवून देताना उदाहरणे देऊन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. व्याख्यानात काही उदाहरणे देऊन त्यांनी वातावरणही भावनिक केले.
घुमरे यांच्या वाढिवसानिमित्त करमाळ्यातील अनेकांनी त्यांचा सत्कार केला. यशवंत परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. बागल गटाचे दिग्विजय बागल, आदिनाथचे तात्यासाहेब मस्कर, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, शिवसेनेचे महेश चिवटे, रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य एल. बी. पाटील, गुलाबराव बागल आदी उपस्थित होते.
घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये यशवंत युवा महोत्सव, रांगोळी स्पर्धा, मिस मॅच डे, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रॅम्प वॉक, मिस वाय. सी. एम. व शेलापागोट्या असे कार्यक्रम झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम यासह सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर व वृक्षरोपण झाले.