करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त आज (रविवारी) करमाळ्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व गोरे यांचे वापरलेले फोटो लक्षवेधून घेत आहेत.
पालकमंत्री गोरे हे पदभार घेतल्यापासून पहिल्यांदाच करमाळ्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते करमाळ्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली होती. लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत चिवटेंचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा होता. दरम्यान अनेक राजकीय घडामोडी झाल्या होत्या. आता पालकमंत्री बनून गोरे करमाळ्यात येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर निंबाळकर व गोरे यांचे वापरलेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे हेलिपॅड असून तेथून सुरु झालेली बॅनरबाजी लक्ष वेधत आहेत. महाविद्यालयापासून करंजकर रुग्णालय, गायकवाड चौक, संगम चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे विवाहस्थळी ते जाणार आहेत. या मार्गावरलावलेले स्वागत बॅनरवरचे फोटो लक्ष वेधत आहेत. यामध्ये अंगावर गुलाल असलेला दोघांचाही फोटो आहे. यामध्ये दोघेही हाताने इशारा करत असल्याचे दिसत आहे. मात्र हा नेमका इशारा काय आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांसह चिवटे यांचा फोटो आहे.