करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगला येथे भेट घेतली आहे. टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख गुळवे व कोंढारचिंचोली सोसायटीचे माजी चेअरमन लतिश लकडे यांनी मुंबईत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी ही भेट घेतली असून शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. गुळवे म्हणाले, आमदार शिंदे हे अजितदादा यांना कायम नेते मानतात. त्यांचा पाठींबा हा अजितदादा यांनाच आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. स्थगिती असलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आम्ही आमदार शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली आहेत. उजनीच्या पाण्याचा प्रश्न व पश्चिम भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न असलेला डिकसळ पूल त्यांच्यामुळे मार्गी लागला आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल.