करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना व भाजप सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवरही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला करमाळ्यातीलही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे करमाळा शहर अध्यक्ष ऍड. शिवराज जगताप ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दैवत मानतो. त्यांच्या अडचणीत आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत. त्यांना आमचा पाठींबा आहे. उद्याच्या बैठकीत आम्ही उपस्थित राहणार आहोत. करमाळा शहर व तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीचे शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही. कोण- कोणाबरोबर आहे हे न पहाता आम्ही शरद पवार यांच्याबरोबर राहून पुन्हा एखादा पक्ष मोठा करण्यासाठी आम्ही रिंगणात उतरणार आहोत. पवारसाहेब जसा आदेश देतील, तसे यापुढे आम्ही काम करत राहणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.