करमाळा (अशोक मरुमकर) : करमाळा तालुक्यात असलेले चारी साखर कारखाने गेल्यावर्षी बंद होते. त्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र जास्त असताना कोणता साखर कारखाना सुरु होणार आणि ऊस गाळपाचे पैसे मिळणार का? याची शंका शेतकऱ्यांच्या मनात आहे. यावर बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी ‘निश्चित रहा तुमच्या ऊसाचे एक टिपरूही राहणार नाही’ असे म्हणत अनऔपचारिक गप्पात शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.
जातेगाव येथे ‘ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान AI या विषयावर चर्चासत्र झाले. त्यामध्ये बारामती ऍग्रोचे अध्यक्ष पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीत उत्पादन वाढवायचे असेल तर बदलते तंत्रज्ञान वापरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. चर्चासत्र झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी अनऔपचारिक गप्पा मारल्या. तेव्हा शेतकऱ्यांनी आदिनाथ कारखान्याबाबत त्यांना प्रश्न केला. या प्रश्नावर ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी सुभाष गुळवे यांनी या कारखान्यात लक्ष घातले होते. कायदेशीररित्या हा कारखाना आमच्याकडे आला होता. मात्र त्यात पुढे अडचण निर्माण केली गेली. मला यामध्ये राजकारण करायचे नाही. शेवटी शेतकऱ्यांचे हित महत्वाचे आहे. कोण काय करते आहे याकडे आमचे लक्ष नसून आमच्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना न्याय देत आहोत. यावर्षी तुम्ही निश्चित रहा आम्ही तुमच्या उसाचे एक टिपरूही शुल्क ठेवणार नाही,’ असे ते म्हणाले. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, सचिन नलवडे, सुभाष पवार, भाऊसाहेब वारे, ईश्वर वारे, रणजित जगताप, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.

गेल्यावर्षी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस बबनदादा शिंदे यांचा माढ्यातील कारखाना, बारामती ऍग्रो, अंबालिका, हाळगाव, हिरडगाव, म्हैसगाव आदी कारखान्यांकडे गाळपासाठी गेला होता. यावर्षी आदिनाथ कारखाना आमदार नारायण पाटील यांच्याकडे आहे. त्यांनीही हा कारखाना सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र सुरु होईल का नाही याबाबत चर्चा केली जात आहे. बागल यांच्या ताब्यात असलेल्या मकाईसाठी १४० कोटी मिळाले आहेत. त्यामुळे हा कारखाना सुरु होईल अशी शक्यता आहे. मात्र थकीत पगारासाठी कामगारांचे आंदोलन सुरु झाल्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे. कमलाई व विहाळ कारखाना सुरु झाला तरी पैशामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. त्यात आता चांगला दर आणि वेळेवर पैसे देणाऱ्या कारखान्याकडे शेतकऱ्यांचा ऊस देण्याकडे कल आहे.
