माजी आमदार शिंदे यांची कामोणेतील आवळा शेतीला भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : कामोणे येथील आवळा उत्पादक प्रगतशील बागायतदार बाळासाहेब काळे यांच्या शेतीला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट दिली. काळे यांना शेतीतील नवनवीन यशस्वी प्रयोगामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या शेतीला भेट देऊन माजी आमदार शिंदे यांनी नवनवीन प्रयोगाची माहिती घेतली.

कामोणेला शेतीसाठी कायमचे पाणी नाही. मात्र प्रचंड इच्छा शक्ती असलेल्या बाळासाहेब काळे यांनी शेती विकसित केली आहे. त्यांनी आवळाची बाग केली आहे. त्यामध्ये ते अंतर पीक घेत असतात. यावर्षी मात्र त्यांनी नारळाची झाडे लावली आहेत. शेतीला पाणी कमी आहे हे माहिती असताना त्यांनी खचून न जाता सुरुवातीला शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केले. त्यांच्या शेतात विहीर व बोअरला सौर कृषीपंप आहेत. दुष्काळात त्यांनी पाणी कमी पडल्यानंतर विकतचे पाणी घेऊन फळ बाग जोपासली. पाणी कमी असताना नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती कशी करायची याचे उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे.

करमाळा – जामखेड रस्त्यावरील कामोणे फाटा ते कामोणे दरम्यान रस्त्याच्या बाजूलाच त्यांची शेती आहे. संपूर्ण शेती त्यांनी सीसीटीव्हीच्या नियंत्रणात ठेवली आहे. ठिबकद्वारे ते शेती करत आहेत. जनावरांचे शेण व मूत्र यावर प्रक्रिया करून खत म्हणून त्याचा ते शेतीत वापर करत आहेत. गोबरगॅसमुळे त्यांना कधी गॅस सिलेंडर घ्यावे लागत नाही. संपूर्ण कुटुंबाचा स्ववयंपाक त्यावर होतो. या शेतीची माजी आमदार शिंदे यांनी माहिती घेतली.

कामोणेचे सरपंच रमेश खारत, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड, राष्ट्रवादीचे अजिंक्य जाधव- पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी एन. के. अभंग, बिटरगाव श्री येथील बबनराव मुरूमकर, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, आळजापूरचे युवराज गपाट, पत्रकार अशोक मुरूमकर, पोथरेचे शहाजी झिंजाडे, प्रवीण घोडके, मांगीचे माजी सरपंच संपत बागल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *