करमाळा (सोलापूर) : सोलापूर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावर असलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा भराव खचला आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांची वाहतूक बंद झाली आहे. या पुलाची पहाणी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उजनीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पुलाचा भराव खचला आहे. येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या भागात नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे उजनी जलाशयावर बांधण्यात येणाऱ्या पुलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा, अशी मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातसुध्दा आमदार पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला होता. एकतर डिकसळ पुल हा सर्वात जुना ब्रिटिश कालीन पुल आहे. यास पर्याय म्हणुन नवीन पुल मंजुर आहे. तसेच या जुन्या पुलाचे ऑडीट सरकारकडून केले गेले आहे. यामुळे सध्या तरी असलेले दळणवळणाचे एकमेव साधन म्हणुन डिकसळ पुल उरला होता. यामुळे आता या भागातील नागरिकांना दळणवळणाची सोय उरली नाही. यामुळे हा डिकसळ पुल तातडीने दुरुस्त केला जावा व नव्या पुलाचे काम युद्ध पातळीवर पुर्ण केले जावे अशी नागरिकांची मागणी केली.
आमदार पाटील यांनी तातडीने या पुलाची पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. पुढील कामे तातडीने पुर्ण करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिली. या पाहणी वेळेस किरण कवडे, नवनाथ बापू, नागनाथ लकडे, ज्ञानेश्वर दोडमिसे, राजेश साळुंखे, अण्णासाहेब गलांडे, नीलकंठ शिंदे, रवी खांडेकर, डॉ. पाटील, दिलीप काका गलांडे, सुरेश कांबळे, उत्तम गलांडे, आनंद धांडे, किशोर खांडेकर, अमोल गलांडे, चंद्रकांत पाडुळे, रणजित गलांडे, सचिन गोडगे, राजेंद्र गोडसे, रवींद्र मोरे, शेंडगे बापू आदी उपस्थित होते.