करमाळा (सोलापूर) : ‘पारधी समाजाच्या जीवनात एक चांगली पहाट यावी त्यांची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण, आरोग्य सदृढ व्हावे. त्यांना उद्योगधंदे करण्यास प्रवृत्त करावे म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. त्याची सुरुवात आज करमाळा तालुक्यात झाली’ असल्याचे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले आहे.
करमाळा पोलिस ठाण्याच्या वतीने ‘पहाट’ कार्यक्रमाअंतर्ग जिंती बीटमधील भगतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती समाज कल्याण विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत पारधी समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बनकर उपस्थित होते. या बैठकीत पारधी समाजाला मार्गदर्शन करण्यात आले.
गुन्हेगारी पासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाला मार्गदर्शन केले जात आहे. चोऱ्या, बेकायदा दारू विक्री करू नये याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक दिनेश काळे यांनी त्यांना शबरी आवास योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची माहिती दिली. त्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, अपंगाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमीसाईल, जागेचा उतारा आदीबाबतही यावेळी माहिती देण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागचे गोरख खंडागळे यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजनामध्ये मागासवर्गीय शेळीपालन, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, दिव्यांगासाठी शेळीपालन, पिठाची गिरणी, दिव्यांगासाठी असणारी स्कुटी आदीबाबत मार्गदर्शन करून त्यासाठी मिळणारे अनुदानाबाबत व कागदपत्रबाबत माहिती दिली.
केंद्रप्रमुख गोरे व अंगणवाडीच्या उर्मिला गुंजाळ यांनी पारधी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण घेणेबाबत आवाहन केले. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच शिक्षणासाठी सरकारकडून मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली.