करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात यावर्षी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार, शनिवार व रविवार असा तीन दिवस थरांचा थरथराट आणि बक्षीसरूपी ‘लोणी’ मिळणार आहे. सिनेकलाकारांच्या आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत यंदाचा गोविंदांचा हा उत्साह ओसंडून वाहणारा आहे. जल्लोषपूर्ण वातावरण यावर्षीचा दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे.
करमाळा शहरात मंबई व ठाण्याप्रमाणे दहीहंडी उत्सव होऊ लागले आहेत. एलईडी लाईट्स, डेकोरेशन आणि डीजेच्या तालात तरुणाई थिरकत आहे. यावर्षी सिनेकलाकार व रिलस्टारची हजेरी आहे. शुक्रवारी गायकवाड चौक परिसरात शिवशंभू प्रतिष्ठाणची दहीहंडी झाली. आज काही मंडळांची असणार आहे. तर काही मंडळांची उद्या दहीहंडी असणार आहे. विविध राजकीय नेते व मंडळांकडून हा दहीहंडी उत्सव आयोजित केले आहे. या उत्सवात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भर पडली आहे, असे बोलले जात आहे.

भाजपचे गणेश चिवटे यांनी सुरु केली गायकवाड चौक येथील दहीहंडी उत्सव लक्षवेधून घेणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार संजयमामा शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. राशीन पेठ तरुणसेवा मंडळाचा राशीन पेठमध्ये दहीहंडी उत्सव असणार आहे. त्यांचे मात्र सर्फराईज आकर्षण असणार आहे. एलईडी स्क्रीन, बेस्ट लाईट्स, बेस्ट साऊंड, टॉप ऑपरेटर्स असणार आहे. तेथूनच जवळ असलेल्या मेन रोडवर गजराज तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव असणार आहे. या मंडळाचे दहीहंडी उत्सवाचे चौथे वर्ष आहे. संस्कृती प्रतिष्ठाणचे दहीहंडी उत्सवाचे यंदाचे ११ वे वर्ष असून यावर्षी आकर्षक डेकोरेशन आणि जोरदार साऊंड सिस्टीम असणार आहे.

दत्तपेठमध्ये विशेष देखावा
दत्तपेठ तरुण मंडळ आयोजित मा. श्रेणिकशेठ खाटेर युवा मंचचा दत्तपेठमध्ये मोठ्या उत्सहात दहीहंडी उत्सव होणार आहे. आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजयमामा शिंदे, किरण सावंत यांची यावेळी उपस्थितीत असणार आहे. यावर्षी मंडळाने प्रथमच देखावा ठेवला असून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत महिलांच्या हस्ते त्यांचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे.

उद्या करमाळ्यात जोत्सना सपकाळ
शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांच्या नेतृत्वाखाली द किंग्ज जीएसआय व कृष्णाजी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव होणार आहे. ‘नटीणी मारली मिठी’ फेम जोत्सना सपकाळ यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १७) दहीहंडी उत्सव होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे व जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वृदांवन समोर हा उत्सव होणार आहे. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे राखुंडे यांनी सांगितले आहे.