एक शाळेत तर दुसरा कामावर जाणाऱ्या भावंडाच्या दुचाकीला मालवाहतूक गाडीची करमाळ्यात धडक, मोटारसायकलचा चक्काचूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : जातेगाव- टेंभुर्णी महामार्गावर करमाळा शहरातील बायपासला हॉटेल जगदंबाजवळ मोटारसायकलवरील दोघा भावंडाना मालवाहतूक गाडीने धडक दिली. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे दाखल केले आहे. जखमी दोघेही बिटरगाव श्री येथील आहेत. महेश महादेव गवळी (वय २०) व शुभम महादेव गवळी (वय १६) अशी जखमींची नावे आहेत. शुभम हा महात्मा गांधी विद्यालयात दहावीत शिक्षण घेत आहे. तो कामावर जात असलेल्या मोठ्या भावाबरोबर करमाळ्यात शाळेसाठी येत होता. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे.

शुभम व महेश दोघे सख्खे भाऊ आहेत. शुभम हा शाळेत येत होता. मोठा भाऊ महेशबरोबर तो आला होता. दरम्यान आज (मंगळवारी) सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास बायपासला त्यांच्या मोटारसायकलला मालवाहतूक गाडीने जोराची धडक दिली. या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेने स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगितले जात आहे.

हा अपघात एवढा मोठा आहे की मोटरसायकलवरून मालवाहतूक गाडीचे चाक गेले असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या खाली जाऊन बाजुच्या दुकान फलकाला व पंक्चर दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या टायरला गाडी धडकली. यात गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र दोघांनाही गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. अपघातस्थळी दोघा भावंडांच्या चप्पला व जेवणाचे डबे पडलेले आहेत. हे चित्र डोळ्यात पाणी आणणारे होते. यामध्ये अजून गुन्हा दाखल झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *