करमाळा (अशोक मुरूमकर) : बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी एजंटगिरी सुरु झाल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यातून नोंदणीसाठी काहीजण जादा पैसे घेत होते. मात्र आता या एजंटगिरीला चाप बसणार असून करमाळ्यात स्वतंत्र कार्यालय सुरु झाले असून तेथे मोफत नोंदणी होणार आहे, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.
राज्य सरकारच्या कामगार विभागाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत करमाळ्यात बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरु झाले आहे. या सुविधा केंद्रामुळे एजंटगिरीला चाप बसणार आहे. पूर्वी ही नोंदणी करण्यासाठी एजंटच्या मागे लागावे लागत होते. त्यात आर्थिक लूट होत होती. कामगारांना सुविधाही मिळण्यास अडचण होतहोती. मात्र आता या सुविधा केंद्रामुळे मदत होणार आहे.
सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना दिल्या जात आहेत. त्याचा लाभ मिळावा म्हणून बांधकाम कामगाराची नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड, कुटुंबातील व्यक्तींचे आधारकार्ड, रेशन कार्ड, मागील १२ महिन्यात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, ठेकेदाराचे नोंदणीपत्र, नवीन नोंदणीसाठी मोबाईल नंबर. यासह नूतनीकरणासाठी पूर्वी वापरात असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. स्व. नामदेवराव जगताप क्रीडा संकुल परिसरात हे सुविधा केंद्र सुरु झाले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.