करमाळा (सोलापूर) : येथील देशभक्त नामदेवराव जगताप क्रीडा संकुल (जीन मैदान) येथे पहिल्यांदाच यावर्षी ‘आमदार केसरी २०२४’ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये तीन महाराष्ट्र केसरी, दोन उपमहाराष्ट्र केसरी व एक भारत केसरी यांच्या कुस्त्या होणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी ३ ते ८ यावेळेत या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, डॉ. राहुल कोळेकर, विलास पाटील आदी उपस्थित होते. आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा होणार असून सोलापूर जिल्हा्यातील सर्वात मोठे कुस्त्यांचे भव्य मैदान ठरेल, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मैदानामध्ये नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.
निमगिरे म्हणाले, करमाळ्यात भरवण्यात येणार हे कुस्त्यांचे मैदान महाराष्ट्रातील नामवंत मैदानांच्या धरतीवर असणार आहे. त्याचे स्वरूप हे वारणा, पलूस व कुंडलच्या मैदानासारखे असणार आहे. सुमारे 700 कुस्त्या या मैदानावर लागणार असून सर्व कुस्त्या निकाली होणार आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस चांदीची गदा आणि 5 लाख असणार आहे. या कुस्ती मैदानाचा सर्व कुस्तीपटूनी व कुस्तीप्रेमिनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुनील सावंत, दादा इंदुलकर, भारत वस्ताद, पिंटू सरपंच, सुरेश शिंदे, देवा कोळेकर, अमोल गायकवाड, दादा जाधव, अमोल लावंड, गणेश साळवे, प्रवीण हिरगुडे, राजेंद्र बिडवे, उमेश इंगळे, गजेंद्र कोळेकर, जितेश कांबळे, इकबाल इनामदार, भाऊसाहेब खरात, अक्षय पिसरे, लालासाहेब काळे हे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.