करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वा) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत कृषी मंत्री धंनजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १०) मुंबईत मंत्रालयात बैठक होणार आहे. विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात शेलगाव येथील उपलब्ध जागेत केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात मागणी केली होती.
सोलापुर जिल्ह्यात केळी लागवड वाढलेली आहे. त्यामुळे केळी उत्पादनाला वाव देण्यासासाठी व योग्य व्यवस्थापनासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे गरजेचे असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणले होते. महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे केळी संशोधन केंद्र, जळगाव आणि नांदेड येथे आहे. या केंद्रांच्या माध्यमातुन केळी उत्पादक शेतक-यांना अनेक संशोधनपर महत्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचललेला आहे.
त्या दृष्टीने या भागातील हवामान, मृदापरीक्षण, केळीच्या जाती, लागवडीचे तंत्रज्ञान, अन्नद्रव्यांची मात्रा, केळी पिंकावरील रोग व किंडींचे व्यवस्थापन, शिक्षण आणि प्रशिक्षण यादृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी शेलगाव येथील कृषी विभाग महाराष्ट्र शासन फळरोपवाटिका व महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कोरडवाहु संशोधन केंद्राच्या एकुण सुमारे १०० एकर जागेपैकी उपलब्ध जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्याच्या दृष्टीने संबधित विभागांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहीती मोहिते पाटील यांनी दिली आहे.