करमाळा (सोलापूर) : ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालून केलेल्या हत्येचा करमाळ्यात आज (शुक्रवारी) निषेध करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देत हा निषेध करण्यात आला आहे.
फरतडे म्हणाले, सरकारकडून गुंडाना पोसण्याचे काम सुरू आहे. आमदारांकडून गणेश मिरवणूकीमध्ये, पोलिस स्टेशनमध्ये भर दिवसा गोळीबार केला जात आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना पद वाटली जात आहेत. आम्ही कायदा हातात घेतला तरी सागर बंगल्यावर आमचा बाॅस बसला असून पोलिस आमचे वाकडे करू शकत नाहीत, असे पोलिसांसमोर सांगण्याची हिम्मत आमदार करत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अनेक सराईत गुन्ह्यात असलेले गुन्हेगार मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढून मंत्रालयात रिल्स काढत आहेत. याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देवून केली आहे.
या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख संजय शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुकाप्रमुख शंभू फरतडे, शहरप्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर पांढरमिसे, सोमनाथ पोळ, मयुर तावरे उपस्थित होते. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्विकारले.
करमाळा तालुका संभाजी ब्रिगेड यांनी शिवसेनेच्या मागणीस पाठिंबा देऊन घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला. या वेळेस संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा सचिव गणेश सव्शासे, तालुका संघटक मयुर सावंत, शहर अध्यक्ष वैभव माने, कार्याध्यक्ष राजेश ननवरे उपस्थित होते.