करमाळा (सोलापूर) : शांततेत व उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून करमाळा तालुक्यातील ४५० संशयित गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३१ संशयित हे गंभीर गुन्ह्यातील आहेत गणेशोत्सवा दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.
करमाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी १०५ गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. हा गणेशोत्सव आंनदी वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहरातील चौकाचौकात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच महिला पोलिसही बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या उत्सहात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४५० संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून अंतिराम बॉन्ड घेण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये ३१ जण हे गंभीर गुन्ह्यातील आहेत, असे सांगण्यात आले आहे.