करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे ऊस बिल थकीत आहे. हे बिल मिळावे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बुधवारपर्यंत (ता. 3) ऊस बिल न दिल्यास मकाई सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे प्रा. रामदास झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, प्रा. राजेश गायकवाड, हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, विठठल शिंदे, माधव नलवडे आदींनी कुमार आशीर्वाद यांची व पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची आज (सोमवारी) बी सोलापुरात भेट घेतली.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे सत्ताधारी बागल गट फक्त आश्वासन देत चालढकल करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्याबाबत संबंधित संचालक मंडळ व प्रशासन यांची भूमिका आपल्याला लक्षात आली असून यावर आपण ३ तारखेला म्हणजे त्यांना चर्चेसाठी बोलवले असून त्याआधी त्यांनी ऊस बिल देणे अपेक्षित आहे. त्यांनी ऊस बिल न दिल्यास आपण मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाई करणार असल्याची यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.