आता काहीही झाले तरी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस करा.. धैर्यशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या, अशी मागणी मोहिते पाटील समर्थक करत आहेत. आपण राष्ट्रवादीत होतो तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्रास होता, मात्र आता तेच शरद पवार यांच्याबरोबर नाहीत म्हणून तुम्ही शरद पवार यांची तुतारी घेऊन रिंगणात उतरा, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीत भाजपने मोहिते पाटील यांना डावलले आहे, असा आरोप करत मोहिते पाटील समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यांना केलेली मदत, मोहिते पाटलांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची सुरू असलेली चौकशी व इतर प्रकरणे पाहता भाजपसारख्या महाशक्तीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविण्याचे धाडस मोहिते पाटील करणार का? याबद्दल आजही स्पष्टता नाही. मात्र भाजपने आपल्याला डावलले असल्याचा त्यांचा सुरु असून मोहिते पाटील गट टिकवण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा मोहिते पाटील समर्थक करत आहेत.
आपण भाजपबरोबर जाण्यापूर्वी आणि राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खेळीचा त्रास सहन करावा लागत होता. आता अजित पवार हेच शरद पवार यांच्याबरोबर नाहीत. त्यामुळे मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्याकडून बळ मिळेल. भाजपविरोधी मते आपल्याला बाजूला येतील, असा अंदाज कार्यकर्ते लावत आहेत. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच उमेदवारीबाबत डावपेच आखल्याचे दिसते. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णयायक असल्याने माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात झालेली निराशा, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात झालेल्या ओबीसी मेळाव्यात घेतलेली उघड भूमिका या बाबी जानकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. मात्र मोहिते पाटील यांच्याबाबत तसे काहीच नसून मोहिते पाटील यांना डावलल्याने सहानभूती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण तुतारीच घ्यावी, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.
मोहिते पाटील यांनी करमाळा, सांगोला दौरा केला आहे. त्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र कार्यकर्ते तुतारी घ्यावी, अशी मागणी करत आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील समर्थक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर समर्थकांच्या नाराजीचा भडका उडाला आहे. रामराजे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचा व शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये नुकतीच बैठक झाली. माढा मतदारसंघातील उमेदवारी व भूमिका यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मोहिते, निंबाळकर व जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत. या तिघांनीही अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील अकलूजमध्ये हजेरी लावली होती. मोहिते पाटील समर्थकांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. माढ्यातील उमेदवारीचा तिढा असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातून गाठीभेटींना सुरुवात केली. माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण पाटील हेही मंत्री महाजन अकलूज येथे आले त्याच्याआधी मोहिते पाटील यांची भेट घेऊन गेले होते.