करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात पावसाची आकडेवारी मिळण्यास अडचण येत आहे. करमाळा तहसील कार्यालयात यापूर्वी आकडेवारी दिली जात होती, मात्र आता कृषी विभागाकडील आकडेवारी ग्राह्य धरली जात असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाकडे आकडेवारी मागितल्यानंतर जिल्ह्यातून आकडेवारी आली नसल्याचे सांगितले जात असून संकेतस्थळावर आकडेवारी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
करमाळा तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. अजूनही पावसाची आवश्यकता आहे. काही ठिकाणी आणखी पाऊस पडेल या अपेक्षाने शेतरकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे. तालुक्यात आतापर्यंत किती पाऊस झाला आहे. या माहितीची मागणी होऊ लागली आहे. मात्र करमाळ्यात याची माहिती उपलब्ध होण्यास अडचण येऊ लागली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात याबाबत आज (शुक्रवारी) विचारणा करण्यात आली. मात्र आकडेवारी मिळू शकलेली नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे हे उपस्थित नव्हते. वाकडे यांच्या कॅबिन शेजारी असलेल्या टेबलला विचारले तेव्हा गायकवाड यांचे नाव सांगण्यात आले. गायकवाड यांनी मात्र आकडेवारी सोलापुरातून आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर ही आकडेवारी ऑनलाईनही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांना वाकडे साहेबांकडून आकडेवारी घेऊ का? असे सांगितल्यानंतर साहबेही मलाच फोन करून आकडेवारी घेतील असे सांगितले.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर म्हणाले, सध्या पावसाळा सुरु होऊन महिना झाला. तरी कृषी विभागाकडे पावसाची आकडेवारी सामान्य नागरिकांना मिळत नाही. तेथील कर्मचारी उद्धटपणे शेतकऱ्यांशी बोलतात. कृषी अधिकारी वाकडे यांना संपर्क साधल्यानंतर आकडेवारी दिली जाईल, असे सांगितले. मात्र तेथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आकडेवारी मिळाली पाहिजे. शेतीसंदर्भात योजनांची माहिती दिली पाहिजे, प्रत्येकजण वाकडे यांच्याशीच संपर्क साधून माहिती घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाकडे यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना त्वरित समज द्यावी, अन्यथा कृषी कार्यालयासमोर निर्दशेने केली जातील. प्रत्येक शेतकरी मोबाईल वापरून आकडेवारी घेऊ शकत नाही. या आकडेवारीचा फटका तालुक्यातील काही मंडळाना बसला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी होऊनही पावसाची आकडेवारी कमी असल्याने लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे यावर्षी बळीराजा शेतकरी संघटना आकडेवारीची नोंद ठेवणार आहे.