करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल दिलेले नाही. त्यामुळे प्रा. रामदास झोळ हे आता आंदोलन करणार आहेत. पुण्यात सोमवारी (ता. १८) साखर आयुक्त कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बेमुदत हलगी नाद धरणे आंदोलन होणार आहे. यापूर्वी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. कारणामुळे ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आता गणेशोत्सवाच्या तोंडावरच ते आंदोलन करणार आहेत.
प्रा. झोळ यांनी साखर आयुक्त, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, मकाई कारखान्याचे कार्यकारी संचालक, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मकाई सहकारी साखर कारखान्याने वारंवार पत्र देऊन, सूचना देऊन शेतकऱ्याची ऊस बिल दिले नाही. या पाश्वभुमीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे मोठे सावट शेतकऱ्यावर उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गरजा भागवण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आली असून हा मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्य याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांमध्ये मकाई कारखान्याविषयी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याचे ऊस बिल न दिल्यास मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. आता शेवट आरपारची लढाई म्हणून साखर आयुक्त पुणे येथे भव्य हलगीनाद व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.