करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी बंड करत शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत आज (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याचा परिणाम करमाळ्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे.
१) करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे सुरुवातीपासून अजितदादा पवार यांना नेते मानतात. त्यामुळे त्यांनी अजून जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते अजितदादा यांच्याबरोबर राहतील अशीच शक्यता आहे. ते जर शिंदे व फडणवीस सरकारमध्ये आले तर यापूर्वीच पाठींबा दिलेले माजी आमदार नारायण पाटील यांचीही भूमिका आता महत्वाची असणार आहे. त्याचा परिणाम करमाळा तालुक्याच्या राजकारणावर होणार आहे.
२) माजी आमदार नारायण पाटील यांनी वर्षभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केलेला आहे. सुरुवातीपासून ते शिंदे यांचे काम करत आहेत. मात्र आता पवार हे सत्तेत आल्यानंतर करमाळ्याच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेले पाटील व शिंदे हे काय भूमिका घेतील हे महत्वाचे ठरणार आहे.
३) बागल गटानेही आतापर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची भाजपशी जवळीक आहे. त्यात आता पवारही सरकारमध्ये आले आहेत. पाटील मुख्यमंत्री शिंदे यांना तर आमदार शिंदे हे पवार यांना व बागल यांची भाजपशी असलेली जवळीक याचा येणाऱ्या काळात मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे प्रमुख नेते कशी भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.
४) जगताप गटाने यापूर्वीच तालुक्यात आमदार शिंदे यांच्याबरोबर तर वरच्या राजकारणात भाजपबरोबर अशी भूमिका मांडलेली आहे. अशा स्थितीत येणाऱ्या काळात त्यांचाही निर्णय म्हत्वाचा असणार आहे. कारण जगताप, बागल, पाटील व शिंदे हे तालुक्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र आता त्यांचेच नेते एकत्र आले आहेत. यापुढे आता स्थानिक नेते कसे एकत्र येणार हे पहावे लागणार आहे.