करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याने गेल्या ऊस गळीत हंगामाचे बिले अद्याप दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी मेटकुटीला आलेला आहे. ३० तारखेपर्यंत ही बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर श्री आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे 31 तारखेपासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रा. राजेश गायकवाड यांनी दिला आहे.
ऊस नेऊन ११ महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे महत्वाचे सण पोळा, महालक्ष्मी, गणपती असे कितीतरी सण गेले तरी अद्याप बिल मिळालेले नाही. कारखान्याचे एमडी खाटमोडे हे जबाबदार अधिकारी फोन उचलत नाहीत. आता दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना हक्काचे पैसे अजून मिळत नसतील तर अमरण उपोषण हाच पर्याय असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.
उपोषणादरम्यान काही बरे वाईट झाल्यास संपूर्ण मकाईचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ जबाबदार असणार आहेत, असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी बहुजन आघाडीचे राजाभाऊ कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.