करमाळा (सोलापूर) : ‘मकाई’च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होताच कोळगावमध्ये दुसरा गट पुढे आला आहे. ‘आम्ही मतदान करणार असून बागल गटाचे उमेदवार विजयी केले जाणार’ असल्याचे कोळगावचे माजी सरपंच अनिल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. थकीत ऊस बिलाबाबत विचारले असता ‘ते नंतर पाहू’ असे ते म्हणाले आहेत.
मकाई कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोळगाव येथे बैठक झाली असून थकीत ऊस बिल व उमेदवारी देताना बागल गटाने विचारात घेतले नसल्याचे सांगत बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे, असे येथील निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेले नंदकुमार पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर हे वृत्त प्रसिद्ध झाले. दरम्यान तत्काळ या निवडणुकीत बिनविरोध झालेले बागल गटाचे उमेदवार सतीश नीळ व माजी सरपंच शिंदे यांनी फोनद्वारे संपर्क साधला आहे.
शिंदे म्हणाले, ‘आम्ही बागल गटाचे समर्थक आहोत. बहिष्कार टाकण्याचा कोणताही निर्णय झालेला नसून मी कारखान्याचा सभासद असून मतदान करणार आहे. मतदान हा आमचा अधिकार असून जास्तीत जास्त मतदान करून बागल गटाचे सर्व उमेदवार निवडून आणले जातील.’