खरंतर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या काही घटना ऐकून अस्वस्थ झालो आहे. त्यात पुन्हा करमाळा तालुक्यातील आणखी एक चिमुकली ‘नराधमा’ची शिकार बनल्याचा प्रकार समोर आला. त्याची बातमी करावी की नाही? या मनस्थितीत आहे. बातमी करावी तर ‘तुम्ही अशा घटनांना’ कशाला प्रसिद्धी देतात? असं म्हणणारा एक वर्ग आहे. नाही बातमी केली तर समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत, ‘असं’ कृत्य करणारा नराधम कसा समजणार? घटना पुढे आल्याचं नाहीत तर गैरकृत्य करणाऱ्यांचे बळ आणखी वाढणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. काही दिवसांपासून घडलेल्या अशा घटनाने सर्वसामान्य अस्वस्थ झाला आहे. त्यात पुन्हा करमाळकरांना शर्मेनी मान खाली घालायला लावणारी एक घटना घडली आहे. करमाळा पोलिसांनी विशेषता आयपीएस अंजना कृष्णा यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे त्याचं तर कौतुक करावंच लागेल! त्यांचे निर्भया पथक ज्या पद्धतीने काम करत आहे ते अतुलनीय आहे. एका चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला असून नराधमाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रार देण्यासाठी तासंतास ताटकळत बसावं लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अनेकजण त्या वाटेला जाईलाच नको असं म्हणून अन्याय सहन करतात. तर काही घटनात ‘बदनामी नको’ म्हणून पीडित कुटुंब तक्रार देईलाच पुढे येत नाहीत. अन्याय अत्याचार करणाऱ्याविरुद्ध तक्रार देईची तर ती कायद्याच्या चौकटीत बसेल का? पोलिस त्या घटनेकडे कसे पाहतात अशा अनेक बाजू त्याला असतात. मात्र पोलिस बांधव कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतात. मात्र त्यांना आपणही मदत केली पाहिजे. अन्याय अत्याचार झालेल्या घटनेत पिडीतांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. तक्रारदार पुढे आला तर पोलिस पूर्ण मदत करतात. आणि संशयित आरोपीला बेड्या ठोकण्याचे काम करतात. अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते काळजी घेतात. शेवटी त्यांनाही भावना असतेच.
एका चिमुकलीवर नराधमाने अत्याचार करण्याचा प्रत्यत्न केला. ज्या चिमुकलीचं अजून प्राथमिक शिक्षण सुरु आहे. तिला ‘कशाचे’ ज्ञान नाही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रत्यत्न नराधमाने केला. मात्र ती ओरडली आणि पळून गेली. हा प्रकार दोन दिवसांनी घरात समजला. तरीही तो नराधम अगदी खुलेआमपणे फिरत होता. याची तक्रार करायची की नाही? तक्रार केली तर आपली इज्जत जाईल? पोलिस मदत करतील का? असे ऐकना अनेक प्रश्न तिच्या कुटुंबियांच्या मनात होते. शेवटी त्यांनी धाडस करून थेट करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांचं कार्यालय गाठलं.
आयपीएस अंजना कृष्णा व निर्भया पथकाने संपूर्ण घटना समजून घेतली. कायदेशीरबाबी तपासून पाहिल्या. कायदेशीररित्या चिमुकलीशी त्यांनी निसंकोचपणे अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यातून त्यांनी तिचा व कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. फक्त एवढेच नाही तर त्यांची सर्व काळजी घेतली. हे करत असतानाच त्यांचे एक पथक नराधमाच्या शोधासाठी गेले. आणि तिथून त्यांनी त्याला उचलून आणले. या सर्व प्रकाराने पीडित कुटुंबियांचे त्यांनी एकप्रकारे मन जिंकलं! घटना गंभीर आहे. अशावेळी कुटुंबियांना धीर देणं ही महत्वाचं असतं. त्यांना ‘आपलंस’ वातावरण झालं नाही तर अशा प्रकरणात तक्रारदार येणार नाहीत. तयार होईल. पण आज करमाळा पोलिसांनी आणि निर्भया पथकाने जे काम केले ते उल्लेखनीय आहे.
पोलिस बांधव मदत करतात फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आणि अशा घटनात तर तक्रारदारांनी न घाबरता पुढे आले पाहिजे. आपल्या मुलांची काळजी देखील घेणे पालकांची जबाबदारी आहे. मात्र तरीही असं प्रकार थांबवण्यासाठी तक्रारदार पुढे येणं आवश्यक आहे. अंजना कृष्णा यांनी मात्र निर्भया पथक सक्रिय केले असून त्यांच्यामुळे असे अनेक प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.
- अशोक मुरूमकर, पत्रकार, करमाळा
