करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे प्रश्न सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती असून हे प्रश्न सोडवण्यासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शेटफळ येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेटफळ येथील प्रगतिशील शेतकरी कैलास लबडे होते. बागल म्हणाले, जेऊर ते कुगाव या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांवर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ही दुर्दैवाचीबाब आहे. मध्यंतरीच्या काळात तालुक्यात ठोस एकही काम होऊ शकलेले नाही. करमाळा तालुक्यातील सामान्य लोकांबद्दल आस्था असणाऱ्या सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने आशा नेतृत्वाची गरज तालुक्यात निर्माण झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून आज रश्मी बागल तालुक्याचे महत्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मकाई साखर कारखान्यासमोरील अडचण दूर झाली असून ऊस वहातूकदारांसह उर्वरित देणी लवकरच दिली जातील. मकाईच्या गाळप क्षमतेचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बागल म्हणाले, सध्या सुरू असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यांना तालुक्यातून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून अनेक दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा आमच्याकडे सक्रिय होत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर पोळ यांनी केले तर आभार मकाईचे माजी संचालक किरण पोळ यांनी मानले.
मकाईचे संचालक दिनकर सरडे, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन विजय रोकडे, रामवाडीचे माजी सरपंच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संतोष वारगड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मकाईचे संचालक रामभाऊ हाके, नवनाथ बागल, बापूराव चोरमले, रेवन्नाथ निकत, आमोल यादव, अशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, गणेश तळेकर, विलास काटे यांच्यासह बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे, मकाईचे माजी संचालक सुरेश पोळ, अविनाश वळेकर, शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, सुनील पोळ, सुभाष पाटील, नानासाहेब पोळ, राजेंद्र गुंड, शंकर पोळ, विजय लबडे, गणेश मोरे, भाऊसाहेब निंबाळकर, महावीर निंबाळकर, साहेबराव पोळ, संभाजी पोळ, महेश घोगरे उपस्थित होते.