पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तहसिल परिसरातील सेतू कार्यालयाबाहेर बेकायदेशीररीत्या सहा महिन्यांपासून सुरु असणारे महाईसेवा केंद्र बंद करण्यासंदर्भात बसपाचे रवी सर्वगोड यांनी तहसिलदार पंढरपूर यांना निवेदन दिले होते. सदर महा ई सेवा केंद्रात पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची आर्थिक लुट केली जात होती.
जात दाखला, उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला, शेतकरी दाखला, अल्प भूधारक, नाॅन क्रिमीलेयर इत्यादी दाखल्यांसाठी शासकीय दरपत्रकापेक्षा ३० पट अधिक दर नागरिकांकडून वसूल केला जात होता. महाईसेवा केंद्रात रेशन कार्डासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली जात असून पैसे देऊन एक दोन वर्ष हेलपाटे घालावे लागतात. नागरिकांशी सौजन्य आणि सहकार्यांने वागणे तर दूरच आरेवारीची भाषा केली जात होती. एक अनाधिकृत दलाल मारुती कट्ट्यावर बसून वंचित, उपेक्षित, निराधार, दलित लोकांकडून खोटे जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी तहसिल कार्यालयातील झीरो सेतू कर्मचाऱ्यामार्फत बेसुमार पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
शासकीय मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली केली जात आहे. संबंधित सेवा केंद्राला इतरत्र परवानगी असताना, पंढरपूर सेतू कार्यालयाबाहेर बेकायदेशीर सुरु ठेवून, निर्णय माहिती व तंत्रविभाग यांचेकडून दिलेल्या नियमांना हरताळ फासले जात आहे. तहसिलदार पंढरपूर यांचेकडून सेवा केंद्र बंद केले असले तरी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली नसल्याचे तहसिल कार्यालय पंढरपूर यांचेकडून तोंडी सांगण्यात आले आहे. अशा स्वरूपाची माहिती रवी सर्वगोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.