करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्यांच्या माध्यमातून पायी चालत येतात. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे प्रशासनातील अधिकारीही भाग्य समजून काम करतात. मात्र यात कोणतीही उणीव राहू नये याचीही जबाबदारी घ्यावी लागते. त्यासाठी अनुभव देखील आवश्यक असतो. त्यातूनच अनुभवी अधिकारी म्हणून ग्रामविकास विभागाने पुणे, सोलापूर, लातूर व धाराशिव येथील पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या अवर सचिव डॉ. उर्मिला जोशी यांनी ही नियुक्ती केली आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी येतात. या दरम्यान येणाऱ्या पालख्यांचे व वारकऱ्यांचे नियोजन करावे लागते. सुरक्षिततेसाठी व सुविधांसाठी आरोग्य, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापन आदींचा समानव्य व संतुलन राहणे आवश्यक असते. त्यासाठी अधिकाऱ्यांचे कौशल्य, अनुभव व जबाबदारी घेणे महत्वाचे असते. त्यासाठी २७ जून ते ७ जुलैदरम्यान ग्रामविकास विभागाच्या सचिव जोशी यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत व आनंद मिरगणे, पुणे येथील इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक प्रशांत काळे, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ व माळशिरस (सोलापूर) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.