सोलापूर : करमाळा– आळजापुर– जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भराव २९ सप्टेंबरला पुरामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या अनपेक्षित परिस्थितीची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा यांनी तत्परतेने कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांना पुराने वाहून गेलेले रस्ते व पूल यांची तात्काळ दुरुस्ती करून दळणवळणाची व्यवस्था सुरळीत होईल यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशित केले होते. तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ही या दृष्टीने वारंवार बैठका घेऊन संबंधित विभागांना सुचित करत होते व पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूरचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम जिल्ह्यातील बांधकाम विभागाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अभिषेक पवार व सहाय्यक अभियंता आदित्य खटाटे यांनी २९ सप्टेंबरला रात्री उशिरा सुमारे १ वाजेपर्यंत काम करून ३० सप्टेंबरला भरावाचे काम पूर्ण केले.या कामामुळे आळजापुर– जामखेड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून जवळा व आळजापूर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. हा राज्यमार्ग सुरू झाल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना त्याचा लाभ होत आहे.
पालकमंत्री गोरे व जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार करमाळा– आळजापुर– जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा भरून वाहतूक सुरळीत
