करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा कुणबी नोंदी सापडल्यानंतर दाखले काढण्यासाठी मराठा समाजबांधवांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. मात्र हे कागदपत्रे काढताना मोडीचे भाषांतर करताना नागरिकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे या ऍक्शन मोडवर आल्या आहेत. मोडी वाचकांनी सामान्य नागरिकांची लूट करू नये, असा प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय त्यांचे मानधन त्वरित मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही दिला आहे, असे तहसीलदार ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

मराठा कुणबी दाखला काढण्यासाठी मोडीचे भाषांतर करण्यासाठी करमाळा येथे मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. मात्र मोडी वाचक पैसे घेत असल्याची लेखी तक्रार तहसीलदार ठोकडे यांच्याकडे आली होती. वांगी येथील उदयसिंह देशमुख, कैलास काळे व अमोल सुरवसे यांनी ही तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेऊन तहसीलदार ठोकडे यांनी मोडी वाचकांना नागरिकांकडून पैसे न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय नागरिकांची गैरसोय करू नका, असे आवाहन केले आहे.

करमाळा येथे प्रत्येक दाखल्यासाठी स्वतंत्र मोडी भाषांतर केल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागत आहे. यावरही तक्रारी आल्या होत्या त्यावर आता एका कुटुंबासाठी एकच प्रतिज्ञापत्र देण्याबाबत सांगण्यात आले आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे राहुल कानगुडे यांनीही तहसीलदार ठोकडे यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान तिकीटाची मागणी केली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मोडी वाचक यांचीही ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने बाजू जाणून घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या विनंतीनुसार आम्ही हे काम सुरु केले आहे. मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे काम करत आहोत. मात्र आम्हाला अद्याप सरकारने मानधन दिलेले नाही. दोन महिन्यापासून आम्ही स्वखर्चाने काम करत आहोत, आमचे दैंनदिन खर्च तरी मिळणे आवश्यक आहे. प्रवास खर्च व इतर खर्चही आम्हाला अद्याप मिळालेला नाही, असे मोडी वाचक बाळासाहेब आल्हाट यांनी सांगितले आहे.

मानधनाचा प्रस्ताव दाखल
सरकारच्या आदेशानुसार मोडी वाचक उपलब्ध करण्यात आले. करमाळा तालुक्यात नारायण आव्हाड व बाळासाहेब आल्हाट हे दोन मोडी वाचक आहेत. त्यांनी ५४ दिवसात २ लाख ३ हजार ७४२ पाने तपासली आहेत. त्यात ६ हजार २३६ कुणबी नोंदी असलेली पाने सापडली आहेत. त्यापैकी १७ हजार ८५० पानांचे भाषांतर त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या कामाची नोंद ठेवली जात असून त्यांना मानधन मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दिला आहे, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *