अकलुज (अशोक मुरुमकर) : माढा लोकसभा मतदार संघाची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश होताच ही उमेदवारी जाहीर केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून मोहिते पाटील समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उमटली होती. त्यानंतर मोहिते पाटील हे तुतारी घेतील अशी शक्यता होती. अखेर त्यांनी बंड करत राष्ट्रवादी प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षप्रवेशापूर्वी शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जयंत पाटील यांनी मोहिते पाटील यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.
यावेळी करमाळा तालुक्यातील ही काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. यामध्ये डॉ. अमोल घाडगे, अमरजीत साळुंखे यांनी भाजपच्या सर्व पदाचा राजिनाम देत प्रवेश केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, अजित तळेकर व महेंद्र पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील आदी उपस्थित होते. प्रणिती शिंदे प्रवेशापूर्वी भेट घेऊन गेल्या होत्या.
यावेळी डॉ. घाडगे यांनी मनोगत व्यक्त करत करमाळा तालुक्यातून आपण मोहिते पाटील यांना मोठे लीड देणार असल्याचे सांगितले आहे. युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख हे देखील यावेळी उपस्थित होते.