करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे उजनी धरणाच्या कुशीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज (गुरुवारी) पहाटे पावणेचार वाजता समाज बांधवाना संबोधित केले. थंडीच्या कडकडाटात जरांगे यांचे विचार ऐकण्यासाठी समाज बांधव थांबले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून समाज बांधव थांबले आहेत हे माझ्या कायम स्मरणात राहील असे त्यांनी यावेळी सांगत उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आरक्षणासाठी हा लढा सुरु असून ठिकठिकाणी समाज बांधवांकडून स्वागत होत आहे. काही ठिकाणी गाडी अडवली जात आहे, समाज बांधवांचे हे प्रेम असून यातून आरक्षणाची तीव्रता लक्षात येते. आपल्याला आरक्षण मिळणारच आहे, मात्र त्यासाठी १ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषणे सुरु करायची असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
पहाटे ३.५४ वाजता जरांगे यांचे मंचावर आगमन झाले. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी अवघ्या चार मिनिटात मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. या सभेला उशीर झालेला असतानाही अनेक समाज बांधव येथे उपस्थित होते. परांडा येथील सभा संपल्यानंतर जरांगे हे करमाळ्यातील वांगी येथील सभेला आले होते. या सभेचा वेळ सांयकाळी ७ वाजताचा होता. मात्र उशीर झाला तरी सर्व बांधव सभेसाठी थांबले होते.