करमाळा (अशोक मुरूमकर) : गणेश विसर्जनाला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला करमाळ्यात गणेश उत्सव मंडळांकडून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले जातात. त्याची तयारी मंडळांनी केली आहे. तर दरवर्षीप्रमाणे सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने याहीवर्षी दोन दिवस देखावा ठेवला असून त्याचे उदघाटन आज (रविवारी) झाले आहे.
करमाळा शहरासह ग्रामीण भागात यावर्षी गणेशोत्सव मंडळांकडून अनावश्यक खर्चाला फाटा दिला असल्याचे चित्र आहे. यंदा अनेक मंडळांनी बाप्पासमोर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ग्रामीण भागात सालसे व जेऊर येथील गणेश मूर्ती भक्तांचे लक्ष वेधत आहे. हिवरे येथील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) शंभूराजे फरतडे यांनी बाप्पाच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा टाकला असून तेथेच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ठेऊन उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दाखवली आहे.
मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे. करमाळा शहरात सोमवारी देखावे सादर केले जाणार आहेत. त्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने रविवारी देखावा सुरु केला आहे. त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक विषयाला स्पर्श केला आहे. इतर मंडळांनी काय देखावे केले असतील याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
करमाळा पोलिस ठाण्याकडून यावर्षी पुरस्कार
गणेशोत्सव मंडळांनी उत्सवात सामाजिक कामावर भर द्यावा. चांगले काम करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा, या हेतून करमाळा पोलिसांकडून यावर्षी पुरस्कार दिले जाणार आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी परीक्षण समिती तयार केली आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बलदोटा, पोलिस पाटील संघटनेचे संदीप पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण राख, पत्रकार अशोक मुरुमकर, ऍड. अपर्णा पद्माळे आदींचा समावेश होता.