इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज (गुरुवार) जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वर्षीच्या ‘प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता’ या घोषवाक्याशी सुसंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी कवडे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले.
‘प्लास्टिकचा वापर कमी करणे, वृक्षारोपण करणे, वीज व पाण्याची बचत करणे’ अशा लहान लहान कृतींचा मोठा परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. आपल्या कृतींमधून पर्यावरण संवर्धन शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी पर्यावरणात अभियांत्रिकी क्षेत्राचे मोलाचे योगदान स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण हे जागतिक संकट आहे. पाण्यातील मायक्रोप्लास्टिकचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे. यासाठी आपले महाविद्यालय संशोधनात्मक उपक्रम हाती घेईल.’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल जगताप, प्रा. सचिन पवार, प्रा. मुजामिल शेख आणि प्रा. बापूसाहेब पवार यांनी मेहनत घेतली.