करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांचा आज (रविवारी) वाढदिवस! मांगी येथील पिताश्री राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या स्वाभिमानी शक्तीस्थळ (समाधीस्थळास) येथे दर्शन घेऊन त्यांनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. बागल हे विधानसभा निवडणुकीत उतरले होते. त्यांनी पडत्या काळात ४१ हजाराच्या दरम्यान पहिल्याच प्रयत्नात मते मिळवली आणि बागल गटाला उभारी दिली. बागल गटाचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मिळालेली मते त्यांच्यासाठी महत्वाची होती.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. महायुतीचे ते उमेदवार होते. राज्यातील अपवाद सोडले तर अनेक सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यातील त्यांच्याकडे असलेला मकाई व आदिनाथ हेही कारखाने अडचणीत आले. त्याचा परिणाम बागल गटावर झाला. मकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे देणे राहिले होते. ते मिळावेत यासाठी अनेक आंदोलने झाली. त्याला तोंड देत बागल गट साधणार तीन वर्ष लढला. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजप प्रवेश केला होता. तेथून पुन्हा बागल गटात उत्साह वाढला.

बागल गट विधानसभा निवडणुकीत प्रचंड बॅकफूटला जाईल अशी शक्यता होती. मात्र महायुतीचा फायदा झाला आणि ४१ हजाराच्या दरम्यान त्यांनी मते मिळवली. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत व नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने हा गट उतरणार आहे. २०२९ ला पुन्हा विधानसभा लढण्यासाठी दिग्विजय बागल हे कामाला लागले आहेत. त्यांनी संपर्क वाढवला असून नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. येत्या काळात सरकारच्या माध्यमातून तालुक्यात विकास करायचा त्यांचा मानस आहे.

बागल गटाचे मार्गदर्शक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांच्यासह माजी सभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, रमेश कांबळे, रामभाऊ हाके आदी मंडळी कामाला लागली आहे. गट वाढवण्यासाठी त्यांनी काम सुरु केले असून आज असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्व. दिगंबरराव बागल मामा यांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
